पावसाची ओवाळणी '
ढगांमध्ये लपून
येतो हा पाऊस
छोट्या आकारांचा होवून
घणाचा होतो थेंब ...
येण्याची वर्दी देताना
वारा पाठवितो सोसाट्याचा
आकाशात काळे ढग जमवित
करतो कडकडाट विजांचा ...
कधी घेतो गारांचे रुप
कधी रिमझिम कोमल
धो धो बरसतो जमीनीवर
अल्हाद थंडावा आणतं ...
पहिल्या पावसाची सर
मातीला करते सुगंधित
करपलेल्या तृणांना रोपांना
नव्याने देतो जीवदान ...
काळ्या मातीला पाजून पाणी
शेतात उगवून आणतो पिक
वनव्याने होरपळलेल्या डोंगराला
देतो नव्याने हिरव्या पैठणीचा साज ...
नदी नाले धरणात करतो
वर्ष भराची पाण्याची आवक
जंगल दऱ्याखोऱ्यांचे
देतो उजळून रंग स्वरुप ...
भावनांची भरते जत्रा
संचारते अंगात बालपण
कलेचे स्फूर्ता दालन
आनंदते रोम रोम ...
नवचैतन्याची ओवाळणी
पावसाने होते दरवर्षी
जीवनाला आस ही
श्रावणसरी बरसाव्यात दरवर्षी ...
© कवी : संजय होनकळस
०८/०७/२०२२ निगडी, पुणे
९८५००३९७६६ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा