' कंदील '
सूर्य जाता नित्य अस्ताला
घासलेटातील वात पेटे कंदीलाला
सांजेला देवून प्रकाश घराला
रात्रीत काजळी चढे काचेला ,
कंदील त्यावेळी असे सोबतीला ...
जुन्या पिढ्यांनी कंदील पाहिले
त्यात त्यांचे संसार बहरले
अभ्यास सणवार कार्यक्रम सारे
थाटले सर्वांनी जमवून आनंदाने ,
कंदीलाने योगदान सर्वांना दिले ...
शेतात जातायेता अंधारात काठीला
बैलगाडीच्या चाकासोबत रस्त्यात वाटाडया
गोठयात ओसरीत रात्री वावरताना
पहाटे विहरिवर पाणी आणताना ,
कंदील गडी असे सोबतीला ....
पौर्णिमेचा चंद्र भासे अमावसेला
देवळात येई काकड आरतीला
लग्न सभारंभात शोभे वरातीला
देश स्वातंत्र्याच्या प्रहराच्या साक्षीला
कंदील होता देशवासीयांच्या साथीला ...
आता सापडतो माळ्यावर अडगळीला
लाईटने खालसा केला त्याचा जमाना
बदलाच्या रेट्याने कंदील संपला
आठवणीच्या क्षणात पुन्हा गवसला
कंदीलाचाही काळ होता मात्र सोन्याचा ...
कवी : संजय होनकळस
२५ /०७ / २०२१