निसर्ग म्हणतोय ' सावधान '
बुध्दीमत्ते तुझ्याच मुळे मी
माझ्यासारखे अनेक
शहाणपणा सोडून हुशार झालो
भौतिक सुखाच्या मार्गी जावून
समाजात नावाजलो ! ...?
हपापलेल्या लोकांच्या संगतीने
विकासाला गती देवू लागलो
निसर्गाला ओरबाडून बळजबरीने
समृद्धी पैसे कमवू लागलो ...
जाणता अजाणतापणी
अहंकार - सत्ता - माज
' पैसा फेंको तमाशा देखो '
ने सर्व काही करू लागलो ,
वर्तमानाला प्रदूषित करीत
संकटांना आमंत्रण देवू लागलो ,
पंचतंत्राचे संकेत धुडकावून
जबरदस्तीने मनमानी करु लागलो ,
जवाबदारीचे घोंगडे भिजत ठेवून
नामानिराळा वागू लागलो ...
स्पर्धा - इर्षा - अहंकार
चढा ओढीने दाखवू लागलो ,
लबाडीचे तंत्र आत्मसात करून
' शेरास सव्वाशेर ' झालो ,
वाटते केव्हा तरी ... तेव्हा
हुशारी स्वस्थ बसू देईना
शहाणपणाच्या बाजूने उभे राहू देईना ,
आता ...
करोना - तापमान वाढ - ढगफुटी
निसर्गाच्या लहरीपणामुळे
ऋतू बदलत चाललायं दिसतंय,
परिणामी ...
आर्थिक नुकसान - आरोग्याची हानी
होत्याचं नव्हतं होताना दिसतंय
अस्तित्वाला येवू घातलेले ग्रहण
साऱ्यांची होणारी हतबलता
सारे सारे निसटून जाताना दिसतंय ,
सावधान ...
निसर्ग प्रेमींचे ऐकले पाहिजे ,
शास्त्रज्ञांचे संदेश पाळले पाहिजे ,
निसर्गाला पूरकच वागले पाहिजे ,
सुधारणा आता केलीच पाहिजे ,
नियम कायदे कडक केलेच पाहिजे
माणसाच्या अस्तित्वाला निसर्गाच्या
कलेने घेतले पाहिजे .....
© कवी : संजय होनकळस
१३.०९.२२
अपवाद असलेल्यांना धन्यवाद 🙏