श्री
' बाजारहाट '
पाकिट पिशवी यादी घेऊन
कधी नव्हे ते मी
निघालो बाजारहाटला
भेटले बरेच जण ओळखीचे
आज काय विशेष ?
विचारू लागले बोलताना ,
मंडईच ती वर्दळीची
आरडाओरडा नित्याचाच
भाजी ताजी निवडलेली
काही ठिकाणी सुकलेली
काय घ्यावे - किती घ्यावे ?
भाव मला करता येईना !
किराणा घेतानाही चुकलो
यादी राहिली बाजूला
पंचाईत होता गोंधळून
बोबडी लागली वळायला
सौ च्या आदेशानुसार ही
खरेदीत हिशोब काही जमेना !
पिशव्या काठोकाठ भरल्या तेव्हा
एकट्याला उचलता येईना ,
ह्यात उशीर होऊन जाता
सौ चा फोन वाजू लागला सारखा
फोन घ्यावा की पिशव्या पकडाव्या
त्रासून घरचा रस्ता पहिला पकडला ,
बाजारहाट काय तो
एकदाचा मला समजला
नंतर घरी उद्भवलेला प्रसंग
न सांगितलेलाच बरा
तुमचाही काहीसा अनुभव असणार
हे ही नको वाचणाऱ्याला सांगायला .
कवी : संजय होनकळस
१९.०५.२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा